Sunday, April 3, 2011

एक कप जो भारताने गमावला

- अभिजित .मी.

सर्वत्र जल्लोष चालूच आहे. २८ वर्षांनंतर भारताने विश्वचषक जो जिंकला आहे. कदाचित अजून २८ वर्षे आम्हाला हा विजय पुरेल. असो. मुद्दा तो नाहीच. मुद्दा तर आहे त्या कपाचा जो भारताने गमावला आहे.

तसं बघितलं तर खेळ हि एक अतिशय सुंदर आणि आनंद देणारी गोष्ट आहे. खेळ नैसर्गिक सुद्धा आहे. तुम्ही कुत्र्याच्या पिल्लांना किंवा वाघाच्याही लहान बछड्याना खेळताना बघितले असेलच. माणसाने आपल्या सामुहिक कल्पना शक्तीने तर खेळांमध्ये इतके शोध लावले कि थक्कच व्हावे. पण आजचा खेळ आणि विशेषत: भारतातील खेळ काही वेगळे आहेत. आणि म्हणूनच भारताने हारलेल्या कपाबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.

सर्वप्रथम तर आपल्या खेळ-प्रेमा बद्दल. जगात ऑस्ट्रेलिया, क्युबा, आणि अनेक युरोपियन देश असे आहेत जिथे लोक खेळ खेळतात, खेळावर प्रेम करतात. त्यांनाही राष्ट्रीयत्व वगैरे भावना असतात, पण आपण त्यांना खेळ-प्रेमी देश म्हणू शकतो. भारत मात्र खेळ-प्रेमी देश नाही. जागतीकिकरणाच्या काळात टी.व्ही.वर कितीही खेळ वाढले असले तरीहि भारत हा खेळ-प्रेमी देश खचितच नाही. स्वत:लाच विचारा, तुम्ही किंवा तुमच्या परीचीतांपैकी कितीजण नियमितपणे खेळ खेळतात? टक्क्यापेक्षा कमी ? विद्यार्थ्यांमध्ये कदाचित जास्त प्रमाण असेल. आम्ही फक्त खेळ (चुकले, क्रिकेट) बघतो, खेळत नाही. पुण्या सारख्या ५० लाखांच्या शहरात जनतेला क्रिकेट खेळण्यासाठी किती मैदाने आहेत? जवळ पास नाहीतच. किती कॉलेजेस मध्ये मैदाने आहेत? तीही जवळपास नाहीतच. क्रिकेट जाऊन द्या, इतर खेळांचे काय? त्यांची तर काही गणनाच नाही. आणि आम्ही क्रिकेट बघतो म्हटले तरी आम्हाला क्रिकेट मधले किती समजते? मिड-विकेट आणि गाली मधला फरक किती जणांना माहित असेल? असो.म्हणूनच भारत-पाकिस्तान सामन्यात आम्हाला भारत जिंकल्याच्या आनंद कमी आणि पाकिस्तान हरल्याचा आनंद जास्त असतो. आमच्या नासा-नसात भिनलेला जातीय वाद मुस्लीम द्वेष त्या दिवशी उफाळून वर येतो - फायनल हारली तरी चालेल पण आज पाकिस्तान हारला पाहिजे हे कुठून येते? आमच्या राष्ट्रवादा पेक्षा आमचा धर्मवाद जास्त प्रभावी आहे! खरे तर भारत-पाकिस्तान सामन्याचा उन्माद अपेक्षितच होता. मला धक्का तेव्हा बसला जेव्हा श्रीलंकेच्या सामन्याच्या वेळी राम-रावणाला मारतोय असे फलक पाहिले! रामायणात क्रिकेट असल्याचे आणि रामाने रावणाला षटकार ठोकल्याचे मी तरी वाचलेले नाही. क्रिकेटचाच मामला असता, तर सर्वात बलाढ्य टीम ऑस्ट्रेलिया हरल्याचा सर्वात आनंद व्हायला हवा होता, पण तो काही दिसला नाही!मग हे सर्व येतंय कुठून ?

तर ज्या देशामध्ये खेळाची संस्कृतीच नाही, तिथे विश्व चषकाचा जो ज्वर आला होता, तो अनेक दृष्टीने अनैसर्गिक आहे. हा ज्वर आला कुठून आणि कशासाठी?

खरेतर भारत हा एका मोठ्या प्रमाणात अपमानित होणाऱ्या आणि लहान प्रमाणात अपमान करणारया लोकांचा देश आहे, जवळ पास इतर सर्व देशांप्रमाणेच. आम्ही दररोज बेरोजगारीचा अपमान सहन करतो, स्वस्त शिक्षण मिळण्याचा अपमान सहन करतो, महागड्या आरोग्य सेवेचा अपमान सहन करतो, बस मध्ये जागा मिळण्याचा अपमान सहन करतो.. दररोज राब राब राबून १०० रुपये सुद्धा मिळवण्याचा अपमान, घरात दररोज फुकटच्या कामगारासारखे राबण्याचा महिलांचा अपमान, जातीवरून अपमान, शिक्षण व्यवस्थेकडून अपमान, सरकारी कार्यालयाकडून, राजकारण्यांकडून, नोकरी मिळाल्यावर ती टिकवण्याच्या लाचारीचा अपमान, मालकाकडून क्षुद्र वागणुकीचा अपमान, मुस्लीम म्हणून जन्माला आलो म्हणून अपमान .. पदोपदी जवळपास प्रत्येक जण अपमान सहन करत असतो. मग एक दिवस अचानक आम्हाला वल्ड कप मिळतो - अपमान विसरण्याचे टॉनिक ! तितकेच नाही तर संपूर्ण आयुष्य भर ज्यांनी अपमान केला आणि ज्यांनी सहन केला त्यांनी एक होण्याचे टॉनिक! भारत देश एक आहे, आणि आम्ही सर्व भारतीय (म्हणजे काय?) आहोत, हे जाणवून देणारे टॉनिक! म्हणूनच पाकिस्तान हरला किंवा श्रीलंका हरली तर आम्हाला आमचा एक तथाकथित दुश्मन हरल्याचा आभास होतो. आम्हाला वाटे कि आमचे सर्व शत्रू आज हरले. वस्तुत: आमचे सर्व खरे शत्रू आज जिंकलेले असतात, आम्ही हरलेलो असतो!

सर्वच जण म्हणतात भारतात क्रिकेट हा धर्म आहे. अगदी बरोबर. धर्मच आहे, खेळ नाही. आणि धर्मावर प्रश्न उपस्थित करता येत नाहीत! त्यामुळेच क्रिकेटप्रेमावर (प्रेमावर?) प्रश्न उपस्थित करणारे सर्व वेडे ठरतात. जगातील सर्वच धर्मांमध्ये धर्मगुरू आणि देव आहे. आमचेही देव आहेत - सचिन पासून ते कपिल पर्यंत. पण आमचे धर्म गुरु मात्र कुठे सहज ते दिसत नाहीत. तीच तर खरी गोम आहे. आम्हाला धार्मिक बनवणारे मात्र सहज दिसत नाहीत. आम्हालाही वाटते कि आमच्या देवांनीच आम्हाला धार्मिक बनवले. जसे अनेक लोक फक्त देवाची पूजा करतात, धर्मात काय लिहिले आहे त्याची पर्वा करत नाही (आचरण तर दूरच) तसे आम्हीही फक्त सचिनच्या शतकांची प्रतीक्षा करतो, क्रिकेट जाणून घेणे किंवा खेळणे आवश्यक नाही!

फार हिम्मत करावी लागते या देशात क्रिकेट बद्दल असे बोलायला. थोडीशी केली आहे, तर अजून थोडीशी करतो.

या देशातील क्रिकेटच्या धर्म मार्तंडांनी त्यांची दुकाने चालू रहावीत म्हणून धर्माच्या गोळ्या आम्हाला नियमितपणे पुरवणे चालूच ठेवले आहे. बी.सी.सी. आय, आय.सी. सी. सारख्या संस्था आणि त्यांचे करविते धनी - सर्व उद्योजक कंपन्या - पेप्सी पासून होंडा पर्यंत आणि कोलगेट पासून वोडाफोन पर्यंत - सर्वांची दुकाने व्यवस्थित चालू आहेत. -१० दिवसांचे क्रिकेट आज २०-२० वर आणून ठेवले आहे, कारण त्यांच्या जाहिराती आणि धंधा चालू रहावा म्हणून. क्रिकेट तर त्यांच्या दृष्टीने सर्वात चांगला धर्म आहे पसरवण्यासाठी - या खेळात तर दर षटकानंतर जाहिराती दाखवता येतात. जगातील इतर लोकप्रिय फुटबॉल सारख्या खेळांमध्ये तर ते शक्य नाही ! तेव्हा क्रिकेट म्हणजे सुलभ्य लाभ! दर बॉल नंतर, विकेट नंतर, ड्रिंक्स च्या वेळी, लंच ब्रेक मध्ये, सामना संपल्यावर, चालू होण्यापूर्वी आणि सर्वात महत्वाचे वन-दे मध्ये तर दिवसभर आणि कसोटीत दिवस जाहिराती! असेच नाही "मोठ मोठे" राजकारणी क्रिकेटमध्ये लक्ष घालत! ५००० (कि २०,०००?) कोटींचा तर नुसता सट्टाच लागला होता! आता सामना फिक्स होतो की नाही ते जाऊन द्या, पण तुम्ही आम्ही मात्र फिक्स झालोच आहोत! टूथपेस्ट पासून गाडी पर्यंत अनेक वस्तू धोनी (एंड कंपनी!) ने आम्हाला विकून आमचे शर्टाचे खिसे कापलेत हि तर लहान बाब आहे, कारण डोक्याचा खिसा कापला गेलाय हे आम्हाला कळालेच नाही!

आज क्रिकेट म्हणजे फक्त पैशांचा मामला आहे. भारतीय संघ (खरेतर तो बी.सी. सी.आय. नावाच्या एका खाजगी संस्थेचा संघ आहे, पण भारतीयांची मान्यता आहे, म्हणून भारतीय संघ म्हणूया) भारता साठी (म्हणजे आपण पामर जनतेसाठी) खेळत नाही, तर पैशांसाठी खेळतो. आपण क्रिकेतचा सामना बघत नाही तर जाहिराती बघतो ज्यामध्ये सामना पेरलेला असतो. संघा मध्ये कोणता खेळाडू असावा यामध्ये जाहिरात दारांचेही मत महत्वाचे ठरते. स्वत:चा आय.पी.एल. साठी "लिलाव"(!!) करून घेण्यात कोणतीही नैतिक चूक वाटत नाही - खेलादुनाही आणि प्रेक्षकानाही. जाहिरात करून अर्ध्या तासाने सामन्याला खेळाडू आल्याचीही उदाहरणे आहेत. आपले कृषी मंत्री मारत चाललेली आपली शेती वाऱ्यावर सोडून क्रिकेट सामने बघत आणि खेळवत बसतात, कारण तिथे पैसा आहे, सन्मान आहे - आम्हाला त्याचे फक्त तोंड देखले वाईट वाटते, कारण भारताला तेच जेव्हा विश्व-चषक देत असतात तेव्हा किती जणांना राग आला असेल हा प्रश्नच आहे. खेळ तर अनेक आहेत ना, मग क्रिकेट सारख्या इंग्रजी गुलामीतून आलेल्या खेळाचेच एवढे कौतुक का? हे खरे नाही का क्रिकेट मध्ये पैसा आहे, आणि तेंडूलकरला शेकडो कोटी मिळतात म्हणून प्रत्येक आई-बापाला आपला मुलगा (मुलगी नाही!) तेंडूलकर व्हावीशी वाटते? प्रकाश पदुकोन, लिएन्डर पेस, सैना नेहवाल किंवा विश्वनाथन आनंद व्हावेसे वातानार्यांचे प्रमाण खरेच खूप कमी आहे (परिस्थिती हळूहळू बदलतेय पण तीसुद्धा क्रिकेटच्याच दिशेने!). तेव्हा सामने फिक्स होतात, किंवा सत्ता लागतो ही तर क्षुल्लक बाब आहे, खरा मामला खेळ खेळ न राहता, लोकांन्ना उल्लू बनवून कंपन्यांचा माल विकण्याचा बनत चालला आहे हा आहे.

क्रिकेट बद्दल असे बोलले म्हणजे राष्ट्रवादावर प्रश्न उठवन्यासारखेच आहे (क्रिकेटचा खेळ एका "राष्ट्र-वादी" नेत्याच्या ताब्यात आहे, हा फक्त योगायोग नाही!). आम्हाला उगीचच वाटते कि क्रिकेट म्हणजे भारताला जोडणारा खेळ किंवा आम्हाला एकत्र आणणारा खेळ. एका अर्थाने बरोबर आहे. तुम्ही क्रिकेट वरच एकत्र या, इतर कुठेही एकत्र येऊ नका - बेरोजगारीवर, धर्मवादाच्या विरोधात, गरिबीच्या विरोधात असे वाटणारे अनेक हितचिंतक लोक या देशात आहेत - जे सामने भरवतात आणि त्यांचे हित साधतात. आणि दुसर्या बाजूने विचार केला तर क्रिकेट मध्ये काहीच राष्ट्रवाद नाही. नाहीतर मग विविध देशांचे खेळाडू असलेले आय.पी.एल. संघ कसे चालतात? राष्ट्रवाद त्यांच्यासाठी फक्त एक हत्यार आहे, तुम्हाला आम्हाला क्रिकेट पायी गंडवण्याचे! भारतात स्वातंत्र्यापुर्वी क्रिकेट "छा" जानेवाला खेळ असल्याचे ऐकिवात नाही. हॉकी ला राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता का मिळाली? कब्बडी, खोखो असे विना पैशांचे सर्व जनतेला खेळता येणारे (अस्सल देशी ?) खेळ कुठे गेले आणि का लुप्त होत चाललेत?

अनेक लोक आहेत या देशात जे खरोखर क्रिकेट वर मना पासून प्रेम करतात, ज्यांना क्रिकेट समजते. त्यांना असे लेख वाचले कि वाटते क्रिकेट ला विरोध चाललाय. इथे इतर खेलांसोबत क्रिकेट ची तुलना नाही चालू, तर मरत चाललेल्या "खेळाचे" आणि मरत चाललेया विचार शक्तीचे रडगाणे आहे!

जागतिकी करण्याच्या या युगात मुठभर अब्जाधीश आणि त्यांचे संगती राज्यकर्ते यांच्यासाठी ते पैसा कमावण्याचे - सत्ता टिकवण्याचे आणि धंदा वाढवण्याचे हत्यार आहे. बुडत चाललेल्या भारतीय अर्थ व्यवस्थेचा क्रिकेट एक तात्पुरता टेकू आहे. त्यांच्या इंडियाने कप जिंकला आहे. मरत चाललेल्या देशातील जनतेसाठी क्रिकेट झिंग आणणारी दारू आहे, आणि हा भारत "उद्योगपती, राजकारणी, नोकरशहांच्या" टीम इंडियाच्या विजयात धुंद आहे. इंडियाने कप जिंकलाय, भारताने गमावला आहे.